Ad will apear here
Next
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग एक


विघ्नहर्ता श्रीगणेश, कुलदैवत श्री लक्ष्मीनारायण/महाकाली आणि सद्गुरूंच्या कृपेने आज छत्रपती श्रीशिवाजीराजेंच्या शिवराज्याभिषेकदिनाच्या शुभमुहूर्तावर श्रीसूक्त लेखमालेचा आरंभ करतो आहे. श्रीसूक्तावर विवेचन करणं हे माझ्यासारख्या अल्पमती, अल्पबुद्धी आणि सर्वसामान्य व्यावसायिक लेखकाच्या दृष्टीने शिवधनुष्य उचलण्यापेक्षाही दिव्य काम आहे याची पूर्ण जाणीव ठेवून, शक्य तितकं स्वत:च्या औकातीत राहून आणि माझ्या बुद्धिमत्तेच्या मर्यादा ओळखून लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. 

श्रीसूक्त हे ऋग्वेदातील वैदिक सूक्त असून, ते संस्कृत भाषेत आहे. ते अतिशय दिव्य फलदायी सूक्त असून, प्रभावी आहे. हे सूक्त ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आहे. या लेखाचा दृष्टिकोन हा सर्वसामान्य वाचकांना श्रीसूक्ताचा लाभ व्हावा व संपूर्ण आयुष्यात धनसंपत्ती, मन:शांती, सौख्याची उणीव भासू नये हा असल्याने मी लेखक या नात्याने श्रीसूक्ताच्या टेक्निकल आस्पेक्ट्सपेक्षा गुणात्मक भागावर अधिक भर देणार आहे हे वाचकांनी ध्यानात घ्यावे. श्रीसूक्ताबद्दल आंतरजालावर बाकी माहिती उपलब्ध असेल. श्रीसूक्ताच्या काही ऋचांबद्दल पाठभेद आहेत, काही ऋचांचा क्रम (Sequence) हा निराळा आहे या गोष्टी ध्यानात घेऊन मी संबंधित लेखमालेत जास्तीत जास्त पारंपरिक, स्पष्ट आणि ऑथेंटिक संदर्भांचा वापर केला आहे. त्या पद्धतीने श्रीसूक्त पठण केल्यास उत्तम असेल. 

श्रीसूक्तात एकूण १५ ऋचा + १ फलश्रुती ऋचा अशा एकूण १६ ऋचा आहेत त्यानंतर दहा ऋचांचे लक्ष्मीसूक्तही श्रीसूक्ताचा उत्तरार्ध किंवा मोठी फलश्रुती म्हणून म्हणण्याचा प्रघात आहे. त्याविषयी नंतर कधी तरी लिहीन; पण सध्या ही लेखमाला संपूर्णपणे श्रीसूक्तावर आधारित आहे.

श्रीसूक्ताच्या संदर्भात माझे ज्ञान जे माझ्या एका गुरूंकडून मला मिळाले (नाव गुप्त ठेवण्याचा आदेश) तेच मी इथे देत आहे. श्रीसूक्ताच्या बाबतीत रूढार्थाने जे नियम आहेत, तेच इथे असतील असे नाही. कारण, मला मिळालेले ज्ञान हे एका निराळ्या गुरूपरंपरेतून मिळालेलं आहे, त्याचे नियम निराळे आहेत.

श्रीसूक्ताच्या १६ ऋचा आणि पुढील लक्ष्मीसूक्ताचा एक पाठ असं एकदा झालं, की श्रीसूक्ताचा एक पाठ झाला असं समजावं. श्रीसूक्ताच्या १६ ऋचांचे १६ वेळा पठण (१६ पाठ) करून लक्ष्मीसूक्त एकदा वाचलं, की एक आवर्तन झालं असं समजायचं. असे १०८, १२१, १००८ पाठ करण्याची परंपरा आहे. आपल्याला श्रीसूक्त आत्मसात झाल्यानंतर तुम्हाला जमतील तसे १ पाठ, ११ पाठ, २१ पाठ, ५१ पाठ, १०८ पाठ तुम्ही करू शकता. लेखमालेच्या शेवटी मी ते सविस्तर सांगेनच कदाचित; पण इथे आपल्याला टेक्निकल संख्याशास्त्रापेक्षा थोडं पुढे जाऊन आध्यात्मिक अर्थाने श्रीसूक्त आत्मसात करायचं आहे हे लक्षात घ्यावं. त्यामुळे पाठसंख्या हा मुद्दा गौण आहे. पाठसंख्येपेक्षा भावना, अर्थाशी एकरूपता, आर्तता या बाबी कैक पटीने महत्त्वाच्या आहेत. श्रीसूक्त हे तुमचेच नव्हे तर तुमच्या पुढच्या काही पिढ्यांचे आर्थिक लाभ करून देणारे आहे. आमच्या गुरूंच्या मते श्रीसूक्त हे जन्मांतरीच्या दारिद्र्यालाही पूर्णविराम देऊ शकते. जो अगदी कर्मदरिद्री आहे (म्हणजे ज्याच्या अत्यंत अशुभ कर्मांची फळे तो या जन्मी भोगतो आहे) अशा माणसाच्याही दोन वेळच्या जेवणाची, कपड्यालत्त्याची आणि डोक्यावर छप्पर देण्याची सोय श्रीसूक्ताने सहज शक्य आहे यात शंकाच बाळगू नये. 

श्रीसूक्त धनसंपत्तीकारक, ऐश्वर्यप्रदायक आणि सौख्यवृद्धी करून देणारे आहे, यात शंकाच नाही; पण त्यासाठी कायमस्वरूपी मद्यपानाचा त्याग करणे, जुगार न खेळणे (जुगाराची व्याख्या ही सरकारी नियमानुसार न चाललेला पैसे खेळून केवळ नशिबाच्या जोरावर चाललेला खेळ अशी आहे. त्यामुळे शेअर्स वगैरे जुगारात येणार नाही. सरकारमान्य लॉटरीदेखील जुगार नाही) आणि परस्त्री/परपुरुष गमन (विवाहबाह्य, अनैतिक आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध) न करणे ही कडक बंधने पाळावीच लागतात. कारण, मद्यपान/जुगार/परस्त्री-पुरुष संबंध या संकल्पनाच मुळात ‘श्री’ या तत्त्वाशी जुळत नाहीत हे ध्यानात घ्यावे. वरील तीन नियमांचे काटेकोरपणे पालन केले तरच श्रीसूक्ताचे अनुभव येणे शक्य आहे. या नियमात पळवाटा शोधणे म्हणजे मूर्खपणा आहे, कारण तिथे तुम्हीच तुमची फसवणूक करत आहात हे लक्षात घ्या... या आणि पुढच्या एका लेखात आपण श्रीसूक्ताची प्रस्तावना संपवून तिसऱ्या लेखापासून श्रीसूक्तविवेचन सुरू करू या. प्रस्तावनेचे दोन्ही लेख नीट वाचून, सेव्ह करून ठेवावेत. रेफरन्ससाठी उपयोगी पडू शकतात. प्रस्तावना लेख वाचल्याशिवाय विवेचन सुरू करू नये... साधारणपणे आठवड्यातून एक लेख देण्याचा प्रयत्न मी करेन.

श्रीसूक्ताबद्दल बोलताना गुरुदेव म्हणाले होते - विश्व हे असंख्य आणि अनंत ज्ञात-अज्ञात स्पंदनांनी भारलेले आहे. विशिष्ट शब्दांनी, उच्चारांनी ती स्पंदने आकृष्ट केली जाऊ शकतात हे निश्चित आहे. शब्द, उच्चारण, कृती, भावना आणि कृतज्ञता या पंचसूत्रीच्या आधारे आपण कोणतीही स्पंदने आकृष्ट करू शकतो हे निर्विवाद सत्य आहे. श्रीसूक्ताची देवता ही महालक्ष्मी नसून, त्या देवतेचे नाव “श्री” आहे. श्री या संकल्पनेत केवळ धन (Cash) अपेक्षित नसून, धनासोबत ऐश्वर्य (उपभोगक्षमता), श्रीमंती (व्यक्तिमत्त्व/सुप्रतिष्ठा), यश (Success), संपत्ती (Wealth, Property, Children, Assets), जमीन (Land), आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य (Long Healthy Life) आणि मन:शांती (Peace of mind) या गोष्टी अनुस्यूत आहेत. श्रीसूक्तामधील १६ ऋचांमध्ये या स्पंदनांना आकृष्ट करण्याचे सामर्थ्य आहे हे निश्चित. फक्त विवक्षित प्रकारे त्याचे श्रीसूक्ताचे पठण, नियमितता, सश्रद्धता आणि मुख्य म्हणजे कृतज्ञतायुक्त आर्त भावनांची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवंय...
(क्रमश:) 

- सचिन मधुकर परांजपे,
पालघर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZAECN
Similar Posts
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग दोन नमस्कार. प्रस्तावनेच्या या दुसऱ्या भागात आपण सर्वप्रथम श्रीसूक्ताच्या भक्तिरसभावनेविषयी जाणून घेऊ या. श्रीसूक्त उच्चारणास तसं कठीण आहे असं अनेकांना वाटू शकेलही, ते सत्यही आहे. श्रीसूक्तातील काही उच्चार, शब्दसंधी कठीण आहेत. वेदोक्त असल्याने त्याच्या पठणाचा अधिकार काहींना आहे, काहींना नाही वगैरे प्रवाद असतात
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग तीन नमस्कार, आजपासून आपण मुख्य विवेचनास सुरुवात करू या. एका भागात एक किंवा दोन ऋचांचा समावेश करून, त्यावर विवेचन देऊन आपण श्रीसूक्त विवेचन पूर्ण करू या, असा माझा मानस आहे. शेवटच्या भागात मी पूर्ण श्रीसूक्त देईन. प्रत्येक ऋचेचा अर्थ जर आपणास नीट समजला, तरच श्रीसूक्त पठणास अर्थ आहे. ऋचेचा अर्थ नीट समजून तो
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग सहा लेखमालेच्या सहाव्या भागात आज आपण ऋचा क्रमांक सहा व सात यांचा अभ्यास करणार आहोत. मी मागेच सांगितल्याप्रमाणे श्रीसूक्त हे ऋग्वेदातील एक अतिशय प्रभावी सूक्त असून ते स्तुतिपर आहे. श्रीसूक्ताची प्रत्येक ऋचा ही मंत्रमय आहे असं म्हटलं, तरी ती अतिशयोक्ती होणार नाही हे सत्य आहे.
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग चार आजच्या लेखात आपण श्रीसूक्तामधील ऋचा क्रमांक दोन आणि तीनचा विचार करणार आहोत. या दोन्ही ऋचा श्रीसूक्तामधील अतिशय महत्त्वाच्या ऋचा मानल्या जातात. श्रीलक्ष्मीच्या अतिशय प्रभावी अशा स्तोत्रांपैकी श्रीसूक्त हे प्रमुख असल्याने ते तर्कशुद्ध, सुस्पष्ट आहे. त्या सूक्तामधील प्रार्थनेचं तंत्रही असंच मोकळं आणि मनस्वी आहे, हे आपल्या लक्षात येईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language